आजवरची वाटचाल
श्री. सुभाष देसाई यांनी ४५ वर्षांपूर्वी गोरेगावच्या सामाजिक व सांस्कृतिक प्रगतिसाठी विविध योजनांच्या माध्यमातून समाजकार्यास प्रारंभ केला. १९६२ साली ते महाराष्ट्राच्या सामाजिक – राजकीय – शैक्षणिक – सांस्कृतिक प्रगतिसाठी कार्यशील झाले. त्यांच्या आयुष्याच्या प्रवासाकडे दृष्टिक्षेप टाकल्यास एक अनोखे व्यक्तिमत्व उलगडत जाते. त्यांची आजवरची वाटचाल पाहता त्यांचा गोरेगावकरांच्या तसेच त्यांचा राजकीय पक्ष ’शिवसेना’ यांच्या प्रती असणारा प्रेमळ विश्वास, जबाबदारी तसेच कर्तव्यपूर्तीची भावना जाणवल्यावाचून राहत नाही. त्यांची समाजकार्य तसेच जनसामान्यांप्रती असणारी आंतरिक तळमळ आणि त्यांची अभ्यासू वृत्ती व परखड नेतृत्व यांच्या अनोख्या संगमामुळेच आज गोरेगावकरांना एक सुखी, समृद्ध असे आयुष्य मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले आहेत.
१९ जून १९६६ रोजी माननीय शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी मा. शिवसेनाप्रमुखांनी प्रचंड मोठी आघाडी उभारली होती. ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवतीर्थावर भव्य मेळावा भरला. शिवसेनाप्रमुखांच्या मुंबईभर घणाघाती भाषणे, विराट सभा, भाषणे होत होती. मुंबईतील मराठी माणसच्या भावनेलाच त्यांनी स्पर्श केला होता. शिवसेनाप्रमुखांचे प्रांजळ विचार, मराठी माणसांविषयीची आत्मीयता, भाषणातील आक्रमकता या साऱ्यांनी तरुण भारावले गेले. मराठी माणसांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळू लागलं. उद्योग व्यवसायात मराठी तरुण दिसू लागले.
लक्षावधी तरुणांप्रमाणेच सुभाष देसाई देखील बाळासाहेब ठाकरे या वादळाकडे ओढले गेले. त्यांचे तळपते नेतृत्व, आंतरिक साद, समाजाच्या प्रश्नांवरती परखड मते या सर्व गोष्टींकडे तरुण वर्ग आत्कृष्ट होणे स्वाभाविकच होते. जिद्दीने आणि असीम निष्ठेने श्री. सुभाष देसाई शिवसेनेच्या कार्यात सहभागी झाले, पण सुभाष देसाईंची जिद्द आणि शिवसेनेप्रती असलेली ओढ एखादी नोकरी मिळविण्यापुरती किंवा स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्यापुरती मर्यादित नव्हती. वैयक्तिक उद्देशापेक्षा त्यांनी शिवसेनेच्या कार्यात स्वत:ला झोकून दिलं.
बाळासाहेबांच्या नेतृत्वाने, त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन १९७२ साली सुभाष देसाई यांनी ’प्रबोधन गोरेगाव’ संस्थेची स्थापना केली, आणि गोरेगावची एका वेगळ्या विश्वाकडे वाटचाल सुरु झाली. प्रबोधनने गोरेगावला एक वेगळीच ओळख मिळवून दिली. या समाजोपयोगी संस्थेच्या स्थापनेपासूनच समविचारी मित्रांच्या सहकार्याने त्यांनी वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा मेळावे, एकांकिका स्पर्धा, व्याख्यानमाला अशा सांस्कृतिक, क्रीडा आणि आरोग्यविषयक उपक्रमांबरोबरच सामाजिक प्रकल्पही उभे केले. गुणी माणसांची अचूक पारख असलेल्या माननीय शिवसेनाप्रमुखांनी श्री. सुभाष देसाईंकडे संघटनेच्या महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपविल्या. हाती घेतलेलं काम अभ्यासपूर्ण आणि नियोजनबद्ध रीतीने, कष्टांची तमा न बाळगता यशस्वी करणं हा सुभाष देसाईंचा स्वभावधर्म!
शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख यांच्यावरील निष्ठा, सामाजिक कार्य, पक्षाचे राबविलेले योजनाबद्ध उपक्रम यामुळे शिवसेनेमध्ये श्री. सुभाष देसाई यांना शिवसेना नेतेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. शिवसेनाप्रमुखांनी दाखविलेल्य विश्वासामुळे व गोरेगावकरांच्या आशिर्वादामुळे त्यांनी गोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणुक जिंकली. या यशामागे पक्ष आणि पक्षनेत्याविषयी असलेली निष्ठा आहेच, पण समाजाप्रती असलेले प्रेम आणि आत्मीयताही आहे आणि त्यापोटी केलेलं समाजाभिमुख कार्यही आहे.
श्री. सुभाष देसाई यांनी आपल्या मतदारसंघात केलेलं विस्तृत कार्य, रक्तपेढी, ओझोन जलतरण तलाव, संगणक शिक्षणवर्ग, ते लोकांना करीत असलेली वैयक्तिक मदत, अडचणीत कायम मदतीचा हात याच सर्व गुणांमुळे सर्वार्थाने ’कार्यसम्राट’ ही पदवी त्यांना सार्थ ठरते.सुभाष देसाई यांनी प्रबोधन – गोरेगावच्या १९७२ पासूनच्या प्रदीर्घ वाटचालीत केलेल्या अनेक प्रकल्पांची उभारणी पाहता ’केल्याने होत आहेरे। आधी केलेची पाहिजे॥’ ह्याचीच प्रचिती येते. सर्वार्थाने ’लोकनेता’ या नावास सार्थ ठरवीले. समाजकारण व राजकारण यांचा अनोखा मिलाफ असणाऱ्या सुभाष देसाई यांनी आजवर अनेक भव्यदिव्य संकल्पना गोरेगावकरांसाठी प्रत्यक्षात उतरवल्या आहेत. ’योजकस्त्र दुर्लभ:’ या वचनाप्रमाणे गोरेगावकरांना एक दुर्मिळ, कलासक्त, सुनियोजक लाभला आहे. आपणच आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते व्यासपीठाच्या जवळपास देखील नसतात. दूर एखाद्या खुर्चीवर बसून ते एकाच वेळेस कलेचा आस्वाद घेतात आणि त्याच वेळेला प्रेक्षकांचा प्रतिसाद, त्यांना होणारा आनंद स्वत: अनुभवतात.
सुभाष देसाई यांनी केलेला गोरेगावचा विकास, गोरेगावमधील नागरिकांना उपलब्ध करुन दिलेली उच्च जीवनशैली, गोरेगावात जपलेला सांस्कृतिक वारसा, गोरेगावातील उद्याच्या पिढीसाठी प्रयत्नपुर्वक जोपासलेली नितीमुल्ये पाहता हा यशाचा पॅटर्न आता ’गोरेगाव पॅटर्न’ म्हणून मुंबईतील जनतेकडून गौरविला जातो आणि या पॅटर्नचे जनक श्री. सुभाष देसाई त्यांच्या समाजसेवेच्या, सामान्यांचे भले करण्याच्या, पक्षाच्या उन्नतीच्या मार्गावरुन वाटचाल करीत राहतात – गोरेगावकरांसोबतच तमाम मुंबईकरच नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेचा आधारवृक्ष बनून, त्यांना सावली देत!