१६३ गोरेगाव विधानसभा मतदारसंघ

Subhash Desai

शिवसेना पक्षप्रमुख

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सुभाष देसाईंचे मनोगत

Uddhav-Thackerayउद्धवजींकडे नेतृत्वाचा प्रचंड आवाका आहे, क्षमता आहे. नेत्यासमोर जी आव्हानं उभी राहतात त्यावर नेतृत्वाची कसोटी लागते. उद्धवजी जेव्हा शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले तेव्हा माननीय बाळासाहेब क्षमतेने कार्य करीत होते. पुढे वय, प्रकृती यामुळे त्यांचा सहभाग कमी होत गेला. त्याच काळात शिवसेनेला संकटांनी घेरले. जवळची मंडळी सोडून गेली. पोटनिवडणुका आल्या, दगाबाजी झाली, जहरी टीका झाली. एकामागोमाग एक आघात झाले. अशा परिस्थितीत उद्धवजी जर शांत राहिले असते तर ते खचले असते. पुन्हा उभं राहणं कठीण होतं, पण ही सारी आव्हानं त्यांनी स्वीकारली, नव्हे ते या आव्हानांना थेट भिडले आणि केवळ स्पषटीकरण देत न बसता शिवसेनाप्रमुखांच्या मार्गदर्शनाने उद्धवजींनी सर्व संकटांवर आणि प्रतिकूल परिस्थितीवर धैर्याने मात केली आणि सारी परिस्थितीच बदलून टाकली. उद्धवजी सौम्य प्रवृत्तीचे आहेत, त्यांच्यात आक्रमकता नाही असं बोललं जायचं. उद्धवजींनी या विधानांना चोख उत्तरं दिली आहेत.

१९६६-६७ साली मी साधा शिवसैनिक होतो. अनेकांबरोबर निवडणुकीची कार्ड लिहिणं, पत्रके वाटणं अशी कामं करीत होतो, कामं करत राहिलो. माननीय बाळासाहेबांनी आणि वरिष्ठांनी विश्वास टाकला, जबाबदार्‍या सोपवल्या. स्वीकारलेल्या जबाबदार्‍या मी प्रामाणिकपणे, परिश्रमपूर्वक पार पाडीत गेलो. १९८८ साली दैनिक ’सामना’ हे वर्तमानपत्र सुरू करायचं ठरलं. माझी पार्श्‍वभूमी अशी होती की, पक्षाची छपाईची कामं मी पाहत होतो. प्रकाशनाची मला आवडही होती. ’मार्मिक’ चं कामही मी केलं होतं. माननीय बाळासाहेब मला म्हणाले, उद्धवजींबरोबर तुम्ही ’सामना’चं कामं पहा. मातोश्री मला घरासारखं आहे आणि कोणत्याही कामाला नाही म्हणायचं नाही हा माझा स्वभावधर्म आहे. उद्धवजी आणि मी एकत्र काम करू लागलो. प्रभादेवीला कार्यालय सुरू केलं. मशिनरी आणली. दैनिकाचं आणि पक्षाचं काम वाढतच गेलं. तेव्हाही माझ्या लक्षात आलं, कोणतंही काम उद्धवजी अभ्यासपूर्ण आणि झोकून देऊन करतात.

उद्धवजी अबोल आहेत – सौम्य प्रवृत्तीचे आहेत आदी टीका खोडून काढताना श्री. देसाई यांनी एका किस्स्याचे स्मरण करुन दिले. ते म्हणतात “ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच्या एका पुस्तकात त्यांनी काही व्यक्‍तिचित्रणे रंगविली आहेत. त्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे व बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या लिखाणानुसार – प्रबोधनकार ठाकरे यांना भेटायला दिनू रणदिवे नेहमी जात असत. त्यांनी म्हटलंय, ’मी जेव्हा प्रबोधनकारांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी जात असे, तेव्हा त्यांचा मुलगा ’बाळ’ जवळपास कुठेतरी बसून काही वाचत, लिहीत किंवा चित्र काढीत असायचा आणि माझ्या लक्षात आलं की, हा मुलगा खूप ’अबोल’ आहे.’ लेखाच्या शेवटी दिनू रणदिवेंनी लिहिलंय की, ’तेव्हा अबोल वाटणार्‍या या मुलाने पुढे लाखो लोकांच्या दु:खांना वाचा फोडली व ते शिवसेनाप्रमुख झाले’. असा उल्लेखही या पुस्तकात आहे.’ तोच संदर्भ देऊन सुभाष देसाई म्हणतात की ’विद्यार्थिदशेत अबोल वाटणारे बाळासाहेब पुढे अन्यायाविरुद्ध आग ओकणारे ज्वालामुखी आहेत असं त्यांच व्यक्तिमत्व उभं राहिलं. उद्धवजींच्या बाबतीतही तेच होत आहे. रक्ताचे गुण असतात, संस्कार असतात.”

“उद्धवजी जेव्हा कार्याध्यक्ष झाले तेव्हा – ते शांत, सौम्य, संयमी आहेत, त्यांच्याकडून काही होणार नाही, शिवसेना आता बुडणार – अशी खालच्या पातळीवरुन टीका होत होती, पण उद्धवजींनी कोणत्याही प्रकारचा आक्रस्ताळेपणा न करता योग्य तो आक्रमकपणा दाखविला. कोणत्याही प्रश्‍नाला थेट भिडणं हा त्यांचा महत्वाचा गुण आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या विधानात नेहमी प्रांजळपणा असतो. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांविषयी ते म्हणाले, ’मी शहरी माणूस आहे. मला शेतीतलं काही कळत नाही, पण आज शेतकरी दु:खात आहे हे मला जाणवतं. माझ्या संवेदना जाग्या आहेत.’

ते खेडोपाडी गेले. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना भेटले. त्यांचे प्रश्‍न जाणून घेतले. कुपोषित बालकांचं प्रमाण महाराष्ट्रात जास्त आहे. त्यांच्या समस्या वर्तमानपत्रांत वाचून आपण हैराण होतो, अस्वस्थ होतो, पण उद्धवजी आदिवासींच्या पाड्यात गेले. कुपोषित बालकांच्या कुटुंबियांची दु:खं त्यांनी पाहिली. आणि केवळ सरकारवर टीका करीत न बसता आदिवासींसाठी जे जे करणं शक्य होतं ते त्यांनी केलं. त्यांना दुधाची भुकटी, औषधं, अन्‍नपदार्थ आणि गरजेची उपकरणं पुरवली. मेळघाटसारख्या ठिकाणी केवळ बालकांसाठी ॲम्ब्युलन्स दिली. चंद्रपूर, नंदुरबार, मोखाडा अशा ठिकाणी खूप काम केलं.

मेळघाटात उद्धवजी दुसर्‍यांदा गेले, तेव्हा गर्दीतून मार्ग काढीत एक बाई उद्धवजींकडे आली. हातातलं मूल तिने उद्धवजींच्या पायावर ठेवलं आणि म्हणाली, ’हे मूल केवळ तुमच्यामुळे वाचलंय. आमच्याकडे मुलं आजारी पडली की ती जगणं अशक्य असतं, पण तुमच्या मदतीमुळेच हे मूल वाचलं आहे.’ अशा प्रकारचे अनेक अनुभव आहेत. पी. साईनाथ, स्वामिनाथन, डॉ. नरेंद्र जाधव आदि मान्यवर तज्ञांशी उद्धव ठाकरे यांनी शेतकर्‍यांच्या आत्महत्या व शेतकर्‍या‍च्या समस्यांवर नेहमीच पोटतिडकीने चर्चा केली आहे. त्यांचा सात-बारा कोरा झाला पाहिजे हीच उद्धवजींची तळमळ आहे.

निवडणुकीच्या काळातील एक अनुभव इथे सांगण्यासारखा आहे. नागपूरला ते विमानातून उतरले, तेव्हा प्रचंड पाऊस पडत होता. उद्धवजींना वाटलं, उद्याची इथली सभा रद्द होते की काय? पण दुसर्‍या दिवशी सभा व्यवस्थितपणे पार पडली आणि त्यानंतर एक शेतकरी त्यांना येऊन भेटला. त्याच्या हातात पिकाची कणसं होती. तो म्हणाला, ’माझ्या शेतात कष्टाने ही मी पिकवली होती. कालपर्यंत ती माझ्यासाठी सोनं होती. पण कालच्या पावसानं त्यांचा चिखल झाला आहे. आता मी काय करू ते सांगा?’ अशा असंख्य प्रसंगांनी आणि प्रश्‍नांनी उद्धवजींच्या मनाचा वेध घेतला आहे. शेतकर्‍यांच्या मनात अशा प्रकारचा विश्वास निर्माण झाला आहे की, हा तरुण नेता आपल्याला बिकट परिस्थितीतून सोडवील. आपल्याला योग्य तो मार्ग दाखवील.”