उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या अभ्यासेतर कलागुणांना, क्रीडाकौशल्याला वाव देण्यासाठी सुवर्णसंधी! अभ्यासापासून मिळालेले स्वातन्त्र्य, वेळेचा सदुपयोग करण्याची भावना, नवीन काही शिकण्याची ईच्छा या सर्व नानाविध गोष्टींचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी करुन घेण्यासाठी श्री. सुभाष देसाई यांनी १९९२ पासून उन्हाळी क्रीडा शिबिरे भरविण्यास सुरुवात केली. प्रबोधन गोरेगावचे सुसज्ज मैदान, क्रीडाक्षेत्रातील येथे उपलब्ध असणार्या ईतर सुविधा व नामवंत प्रशिक्षकां कडून उपलब्ध करुन देण्यात येणारे अनमोल मार्गदर्शन यांमुळे अनेक क्रीडापटुंना या शिबिरांनी क्रीडाक्षेत्रातील नवीन दालने उघडी करुन दिली आहेत. विद्यार्थी तसेच पालकवर्गाकडून सदर उपक्रमांस मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतच आहे. श्री. सुभाष देसाई सर्वांच्या अपेक्षा केवळ पुरवितच नव्हे तर अपेक्षांपेक्षा देखील अधिक अशा नवनवीन योजना दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करत आहेत. ७००-७५० पेक्षा अधिक विद्यार्थी दरवर्षी सदर उन्हाळी क्रीडाशिबिरांचा लाभ घेत आहेत. क्रिकेट, बुद्धिबळ, ऍथलेटीक्स, कराटे, टेबल टेनिस, खो-खो, जिम्नॅस्टिक्स आदि नानाविध क्रीडाप्रकारांचे नामवंतांकडून माफक दरात या क्रीडाशिबिरात मार्गदर्शन उपलब्ध करुन दिले जाते. शिबिराच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या मेहनतीबद्दल प्रशस्तिपत्रक देऊन त्यांचा गौरव देखील केला जातो.
गोरेगावातील नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत केले जातेच तसेच श्री. देसाई यांनी विद्यार्थ्यांच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगतीबाबत दाखविलेल्या आस्थेमुळे देखील नागरिकांत त्यांच्याबद्दलचा आदर द्विगुणित होतो. |