आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ, साधन - सुविधा, नियोजनबद्धता या सर्व गोष्टींना ध्यानात घेऊन श्री. देसाई यांनी ’प्रॉजेक्ट २०००’ या धाडसी उपक्रमाची सुरुवात केली. सदर उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट ८ ते १२ वर्षे वयोगटातील ३० विद्यार्थी निवडून त्यांना ७ वर्षे सतत दर्जेदार प्रशिक्षण देऊन ऍथलेटिक्सच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऍथलेटिक्स पटु बनविणे हा होता.
अत्यंत नावाजलेले व अनुभवी लोकांचा या प्रॉजेक्टच्या नियोजनात सक्रिय सहभाग घेण्यात आला. उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेचे चेअरमन श्री. यशवंतराव गोळे, श्री. सतीश प्रधान (महाराष्ट्र राज्य ऍथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष); श्री जे. डी. पारडीवाला; श्री. डी. बी. पुराण, श्री. कॉसमॉस परेरा, श्री. बाळ गोवींद, डॉ. मनोहर अद्वानकर आदि मान्यवरांनी या योजनेच्या नियोजनात सक्रीय सहभाग घेतला होता.
अनेकाविध निवडचाचण्या जसे कौशल्य चाचणी, कल परिक्षा, वेग परिक्षा, नेत्र परिक्षा आदि गाळणी प्रक्रियेद्वारे सुयोग्य ३० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी लागणारे साहित्य, गणवेश, बुट आदि सर्व गोष्टी देखील जाहिरातदारांच्या सहाय्याने पुरविण्यात आल्या. त्यांच्या शारिरीक गरजा लक्षात घेऊन त्यांना पोषक आहार देखील तज्ञांच्या मार्गदर्शानाद्वारे पुरविण्यात आला. तसेच मोफत वजने ई. साधने जी ऍथलेटिक्स पटुंना उपयोगी पडू शकतात तीदेखील श्री. देसाई यांनी संस्थेमार्फत मोफत वितरीत केली. दोन वर्षे मुलभूत प्रशिक्षण व तत्पश्चात पाच वर्षे उच्च दर्जाचे शिक्षण असा एकुण योजनेचा आराखडा ठरविण्यात आला. सदर ऍथलेट्सना तालुक, राज्य, देश तसेच आंतरदेशीय स्पर्धांमधे जाण्यासाठी संधी उपलब्ध करुन देण्यासाठी देखील संस्थेने विद्यार्थ्यांसाठी बरेच प्रयत्न केले.
सदर चिकाटीने केलेल्या प्रयत्नांना बघता श्री. देसाई यांचे गोरेगावातील विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवर ऍथलेटिक्सच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करुन देशाचे नाव उज्वल करावे हे स्वप्न नक्कीच साकार होईल असा विश्वास गोरेगावकरांनादेखील वाटतो. |