’प्रबोधन गोरेगाव’ या लोकमान्य संस्थेने वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यास सुरूवात केल्यानंतर २४ वर्षांचा कालावधी उलटला. प्रबोधन गोरेगावचे संस्थापक श्री. सुभाष देसाई यांच्या कल्पना सदैव भव्य दिव्य! युवकांचे व्यक्तिमत्व फुलवणारा कोणता उपक्रम राबवावा याची चर्चा त्यांनी सहकर्यांबरोबर केली. त्याचे चपखल उत्तर संस्थेचे संस्थापक सदस्य श्री. विजय नाडकर्णी यांनी दिले. निर्णय घेण्यात आला की राज्य पातळीवर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेस प्रारंभ करावयाचा. शालेय जीवनापासून विविध वक्तृत्व स्पर्धांमध्ये स्वत: श्री. विजय नाडकर्णी यांनी प्राविण्य संपादन केले होते. त्यामुळे स्पर्धांचा दांडगा अनुभव. संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अखंड परिश्रम घेऊन आज स्पर्धेला महाराष्ट्रातील एक महत्वपूर्ण वक्तृत्व स्पर्धा हे स्थान प्राप्त करून दिले आहे.
संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त प्रबोधन गोरेगाव तर्फे ’प्रबोधन दैनिक सामना महावक्तृत्व स्पर्धा’ आयोजित केली व समयोचित ’वक्ता दशसहस्त्रेषु’ ही स्मरणिका प्रकाशित केली.
’वक्तृत्व’ हा जीवनातील अत्यावश्यक गुण आहे. मराठी विद्यार्थ्यांची, विविध स्पर्धा परीक्षातील ’वादविवाद’ वा ’मुलाखती’ मध्ये होणारी कुचंबणा, या गुणाचा विकास करूनच दूर करता येईल. परंतु आजच्या विद्यार्थ्यांच्या ’परिक्षार्थी’ होण्याच्या वृत्तीमुळे ज्याने परिक्षेत ’गुण’ मिळणार नाहीत असे अन्य गुण विकसित करून घेण्याची आवश्यकता नाही, अशी मनोवृत्ती निव्वळ विद्यार्थ्यांचीच नव्हे तर पालकांची व अध्यापकांची झाली आहे की काय असा प्रश्न समोर उभा ठाकतो. अन्यथा महाराष्ट्रातील अनेक शाळांना व महाविद्यालयांना स्पर्धेची पूर्व कल्पना देऊन व स्मरणपत्रे पाठवून देखील जर निवडकच शिक्षण संस्थांचे संघ स्पर्धेस प्रतिसाद देणार असतील तर वेगळा निष्कर्ष कसा काढावा? ही व्यथा फक्त ’प्रबोधन गोरेगाव’ संस्थेचीच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक वक्तृत्व स्पर्धांच्या आयोजकांची असणार हे नि:संशय!
वक्तृत्व कलेचा शास्त्रशुद्ध सांगोपांग विचार करणारे पुस्तक तसेच निवडक नमुनादाखल भाषणे चोखंदळ वाचकांसमोर ठेवण्याच्या दृष्टीने वक्तृत्व कलेच्या प्रसारार्थ उचललेले प्रबोधनचे पूढील पाऊल म्हणजेच ’वक्ता दशसहस्त्रेषु’ ही सुंदर स्मरणिका. य स्मरणिकेमध्ये संस्थेची माहिती देणारा ’रुपेरी वर्षांची गोष्ट’ हा लेख तसेच ’वक्तृत्व - कला की शास्त्र’ आणि ’वक्तृत्व - एक संस्कार’ हे माहितीपूर्ण लेख आहेत. त्याचबरोबर उत्तम भाषणांचे नमुने म्हणून कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे या वाङमय क्षेत्रातील दिग्गजांची भाषणे व अब्राहम लिंकन, सर विन्स्टन चर्चिल या राजकारण धुरंधरांची भाषणे सादर केली आहेत. उत्तम भाषणांचे विविध पैलू आजच्या युवा पिढीसमोर ठेवण्याचा शैक्षणिक उद्देश यातून साध्य होईल. यापैकी काही साहित्य यापूर्वी प्रकाशित झाले असणारच. ते सर्व मान्यवर प्रकाशक या उपक्रमास शुभेच्छाच देतील असा विश्वास बाळगतो.
वक्तृत्व हे उपजत असेल, जन्मजात असेल, नैसर्गिक असेल, पण प्रयत्नांना त्यात जरुर किंमत आहे. वक्ता हा अंशत: जन्मावा लागतो व अंशत: घडवावा लागतो. वक्तृत्व हे प्रयत्नपूर्वक जोपासावे लागते तर ते प्रगत होते, विकसित होते. वक्तृत्व या शास्त्रीय कला व कलात्मक शास्त्राच्या वाढीसाठी सदर स्मरणिका - पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल हे नि:संशय! |