स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जीवन म्हणजे भारताच्या आधुनिक इतिहासातील एक चमत्कारच. या महापुरुषाच्या व्यक्तिमत्वाला इंद्रधनुष्यासारखे अनेक रंग होते. सारेच तेजस्वी नि मोहक! महान देशभक्त, जहाल क्रांतिकारक, ज्वालाग्राही साहित्यिक, कुसुमकोमल कवी, थोर नाटककार, ओजस्वी इतिहासकार, प्रेरक वक्ता, तत्वनिष्ठ राजकारणी, धुरंधर सेनापती आणि खंदा समाज-सुधारक. ’सावरकर’ म्हणजे ’शतपैलू ’ नररत्न!
क्रांतिकारकांचे मुकुटमणी, मृत्युंजय सावरकर यांच्या चरित्रावरील या विविधतेची रेखीव मांडणी लेखक श्री. ह. त्र्यं. देसाई यांनी ’शतपैलू सावरकर’ या पुस्तकात केलेली आहे.
सावरकर - जन्मशताब्दी-संवत्सरानिमित्त प्रकाशित होणारे सहजसुंदर शैलीतील ’शतपैलू सावरकर’ हे पुस्तक वाचकांना सादर करताना आम्हाला फार धन्यता वाटत आहे. ज्यांच्या जीवनाचा शोध घ्यावा, महत्ता अजमावण्याचा प्रयत्न करावा अशा फार थोड्या लोकोत्तर व्यक्तींपैकीच स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत यात काय संशय?
तसे पाहिले तर ’प्रबोधन गोरेगाव’ ही प्रामुख्याने शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम करणारी एक तरुणांची संस्था. विशेषेकरून विद्यार्थ्यांसाठी कार्य करणारी. ग्रंथ-प्रकाशनाच्या व्यवहारात आम्ही हें पहिलेच पाऊल टकले आहे. बुद्धिवादी महाराष्ट्रात पुस्तक-प्रकाशन करणे ही सोपी गोष्ट नाही. इथे सर्वच मापदंड उंचावलेले! त्यामुळे या पुस्तकाच्या निर्मितीवर संस्थेने यथाशक्ति परिश्रम घेतलेले असूनही त्याचे स्वागत कसे होईल याविषयी, मनात धाकधूक आहेच. मात्र, प्रकाशन क्षेत्रातील हे पहिलेच पाऊल सावरकर-चरित्रापासून पडत आहे याचाच फार मोठा आनंद आम्हाला वाटतो.
लेखक प्राध्यापक ह. त्र्यं. देसाई यांनी हे शतपैलूरत्न सिद्ध केले. अनेक शुभचिंतकांचे सहकार्य लाभले. ’प्रबोधन’ चे प्रमुख अध्वर्यु श्री. वसंत तावडे यांनी हा प्रकल्प सर्व बाजूंनी उचलून धरला. छपाईचा कागद उपलब्ध करून देण्यापासून पुस्तक वितरणापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी काया-वाचा-मनाने ते झटले आहेत. संजीव मुद्रणालयाचे श्री. मधुसूदन घळसासी यांनी मुद्रणाचे काम जिव्हाळ्याच्या भावनेने सर्वांगसुंदर आणि अपेक्षित वेळेमध्ये पूर्ण केले. चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी मुखपृष्ठाचे उत्कृष्ट चित्र काढून दिले. पुस्तक आकर्षक व्हावे म्हणून ’प्रबोधन’ चेच श्री. श्रीनिवास शिरसेकर यांनी उपयुक्त मार्गदर्शन व मांडणी केली आहे. रंगीत छपाईचे दर्जेदार काम ’मालती आर्टस्’ चे पंडित बंधु यांनी करून दिले. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी व हितचिंतकांनी प्रकाशनपूर्व नोंदणी धडाक्याने करून या कामाची आर्थिक बाजू सांभाळली.
शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयीची कृतज्ञता कशी व्यक्त करावी? त्यांच्या प्रस्तावनेमुळे पुस्तकाचे वैभव वाढले यात शंकाच नाही. स्वत: श्री. ह. त्र्यं. देसाई यांनी मुद्रित-शोधनाचे काम जातीने, काळजीपूर्वक, न थकता केले. श्री. विलास रुकारी यांनी मुंबई-पुणे-मुंबई अशी धावाधाव करून वेळच्या वेळी लहानथोर कामे उरकली. ’मार्मिक’ साप्ताहिकाच्या २४ व्या वर्धापनदिन - सोहळ्याच्या शुभप्रसंगीच या ग्रंथाचे प्रकाशन योजून शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी आमच्या संस्थेवरील लोभ पुन्हा एकदा प्रकट केला याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत आहोत.
सावरकरांविषयी आजवर अनेक लेखकांनी खूप लिखाण केले आहे. तरीसुद्धा निवृत्त प्राचार्य श्री. हरिभाऊ देसाई यांच्या प्रसन्न शैलीतून उतरलेले ”शतपैलू सावरकर" हे वाचकांचे, विशेषत: युवकांचे लक्ष वेधून घेईल असा आमचा विश्वास आहे. असे घडले तरच हा प्रपंच नेटका झाला असे होईल.
पहिल्या आवृत्तीला शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांचा पुरस्कार लाभला आणि पुस्तक अपेक्षेबाहेर यशस्वी झाले. दुसर्या आवृत्तीमागेही माननीय बाळासाहेबांचे आशीर्वाद आहेत, ही मोठ्या भाग्याची गोष्ट.
सदर पुस्तकाचे सुस्वागत घडून, श्रीरामाला सेतू बांधण्यात साह्य करणार्या खारीइतके जरी सावरकर-विचार-प्रसाराचे कार्य ह्या पुस्तकाने घडले तरी लेखक व प्रकाशक स्वत:ला धन्य समजतील!
जय हिन्द! जय महाराष्ट्र!
- प्रबोधन गोरेगाव, मुंबई |