प्रबोधन गोरेगाव या क्रियाशील संस्थेने मराठी एकांकिका चळवळीला फार मोठ्या प्रमाणावर हातभार लावला आहे. व्यावसायिक रंगभूमीची प्रयोगशाळा म्हणजे एकांकिका स्पर्धा असे जर आपण म्हणणार असू तर ’प्रबोधन’ ने या प्रयोगशाळेला सातत्याने जागृत, जिवंत व अभ्यासशील बनवले आहे असे म्हणता येईल. प्रबोधन संस्था स्थापने पासूनच एका दिशेने वाटचाल करणारी संस्था. उणीव कशाची आहे? कोणत्या उपक्रमाला प्रतिसाद मिळेल आणि तो सातत्याने चालू राहील? या शोधदुर्बिणीतून प्रबोधनला एकांकिका गवसली. १९७२ पासून म्हणजेच स्थापनेच्या पहिल्या वर्षापासूनच प्रबोधनच्या मंडळींनी एकांकिका उत्सवाच्या माध्यमातून एकांकिकेच्या सुप्त सामर्थ्यास हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले.
ज्यांना ’वलय’ नाही त्यांना आपले गुण दाखविण्याची आणि इतरांना ते पारखण्याची संधी या उत्सवामुळे मिळाली.
प्रबोधन गोरेगाव संस्थेने गत वर्षांमध्ये अनेक लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, नट इ. न हक्काचे रंगकेंद्र उपलब्ध करुन दिले आहे हे नि:संशय. ही कामगिरी सांस्कृतिकदृष्ट्या फार मोलाची आहे. ’एकांकिका उत्सव’ ही सुद्धा याच दिशेने प्रबोधनचे पूढील पाऊल. स्मरणिका संग्राह्य व्हावी अशी इच्छा धरूनच ही स्मरणिका सिद्ध करण्यात आलेली आहे. आजच्या रंगकर्मीपेक्षा उद्याच्या रंगकर्मींची पिढी नजरेसमोर ठेऊन हा प्रयत्न केला आहे. या स्मरणिकेत एकांकिका या नट्य प्रकाराच्या विविध अंगांना भिडण्याचा प्रयत्न वाचकांना जाणवेल. एकंदर प्रमुख तीन भाग या स्मरणिकेत आहेत. यातील पहिला विभाग हा समीक्षेचा असून त्या विभागात पूर्वप्रकाशित आसे अनेक लेख वा लेखांश पुनर्मुद्रित केले आहेत. मरठी नाट्य समीक्षेत एकांकिका - विचार कसा झाला याचा एक संक्षिप्त नकाशा या विभागातील काही लेखातून मिळतो (सर्वश्री वा. ल., के. नारायण काळे, ज्ञानेश्वर नाडकर्णी व सुधा जोशी यांचे लेखांश) एकांकिका हा नट्यप्रकार असल्याने तो प्रयोगशरण आहे. कोणत्याही प्रयोगशरण कलेला इतर अनेक कलंवर अवलंबून राहावे लागते व नाट्य ही तर अनेक कलांच्या अर्थपूर्ण व अपरिहार्य साह्याने सिद्ध होणारी कला आहे. प्रकाश-अंधार, नेपथ्य, चित्र व रंग असे अनेक घटक नाट्यात गाभ्याच्या ठिकाणी नांदत असतात. या सगळ्या घटकांनी रंगतंत्र संपन्न होते वा अस्तित्वात येते. श्री. बापूराव नाईक यांचा लेखांश रंगतंत्राची नेमकी, सघन व गंभीर दृष्टी देणार आहे. आज रंगतंत्राचा जो उथळ वापर व विचार होतो त्या पार्श्वभूमीवर हा लेखांश महत्वाचा ठरावा.
सर्वसाधारणपणे गेल्या काही दशकामध्ये मराठी नाटकाच्या आशय-विषयात तसेच रंगतंत्राच्या विचारात ब्रेख्तची छाप दिसते. ’सोयीस्कर’ म्हणून ब्रेख्तच्या प्रेमात पडणार्या किंवा गांभीर्याने ब्रेख्त समजून घेऊ इच्छिणार्या सगळ्यांनाच प्रा. गंगाधर पाटील यांचा लेख मर्मदृष्टी देणारा ठरणार आहे. एकांकिका आणि नाटक यांच्यातील भेद ज्यांना कळला आहे व ज्यांना तो समजून घ्यायचा आहे अशा सर्व अभ्यासू रंगकर्मींसाठी डॉ. अनंत देशमुख यांचा लेख ’आदर्श धडा’ वा वस्तुपाठ ठरावा. मराठी एकांकिका चळवळीत अनेकदा संहितांचे दुर्भिक्ष असते अशावेळी इतर भाषांतून एकांकिकांचे भाषांतर-रूपांतर केले जाते. भाषांतर ही अत्यंत कठीण व गंभीर गोष्ट आहे याची पुरेशी जाणीव भाषांतरकर्त्यांना नसल्यामुळे मूळ संहितेचा ’अवतार’ होतो. भाषांतराची मूल्यता व गांभीर्य समजून घेण्यासाठी डॉ. विलास सारंग यांचा लेख जिज्ञासूंना उपयुक्त ठरावा.
लोककलांचे आपल्या नागर रंगभूमीशी कोणते व कसे नाते असू शकते याचा गंभीर व संशोधनस्वरुपी विचार प्रा. हरिश्चंद्र थोरात यांच्या लेखात समग्रतेने व्यक्त झाला आहे. एका दिशेचे सूचन त्यातून होते.
नाट्य शिक्षण पद्धती व शिबिरे यांच्या अपक्व वृत्तींचे दिग्दर्शन करणारा डॉ. अशोक रानडे यांचा लेख वस्तुस्थितीच स्वच्छ आरसा आहे. नाट्यशिक्षण ही किती गांभीर्याने घ्यावयाची गोष्ट आहे याची जाणीव के. नारायण काळे यांच्या लेखांशावरून वाचकांस पूर्णत्वाने येण्यास मदत होते. डॉ. हेमू अधिकारी व श्री. कमलाकर नाडकर्णी यांच्या विधानांमधून त्यांची एकांकिका किंबहुना एकंदरच कलाव्यवहारांबाबतची गंभीर, पोटतिडकीची पण प्रामाणिक दृष्टी प्रांजलपणे व्यक्त होते.
या स्मरणिकेतील दुसरा विभाग म्हणजे ’संवाद’. कही नेमके प्रश्न घेऊन गेल्या पिढीतील एकांकिकाकाराशी, दिग्दर्शकांशी, नटांशी, समीक्षकांशी मनमोकळ संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. या चर्चेतून त्या पिढीची एकांकिकेकडे बघण्याची कलादृष्टी जशी व्यक्त होते तशीच या सगळ्या मुलाखतींमधून एकांकिकांविषयक एक ऎतिहासिक दृष्टीही व्यक्त झाली आहे.
तिसरा, अत्यंत महत्वाचा व अभ्यासकांना किमान आधारभूत वाटणारा विभाग आहे तो ’संदर्भ’. या विभागातील प्रत्येक पान अधिकाधिक नेटके, परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे हे कुणाच्याही लक्षात यावे. सूचीचे काम इतके अवघड असते की अनेकदा सजग राहूनही गंभीर त्रुटी राहून जातात. प्रस्तुत सूचींचा विचार करताना वाचक आमच्याकडून झालेल्या चुकांबद्दल क्षमा करतील असा विश्वास वाटतो.
’पुन्हा समीक्षा’ या विभागातील अनेक लेख / लेखांश पुनर्मुद्रित केले आहेत. पुन:मुद्रणासाठी आवश्यक ती अनुमती विविध संस्था व व्यक्तींनी आपलेपणाने दिली. त्यांचा आपलेपणा अधिक उत्साहवर्धक होता हे विनयाने नोंदवावेसे वाटते. |