आपले गोरेगाव’ ही मार्गदर्शिका आपल्या हाती देताना खूप आनंद होत आहे.
गोरेगावचा समतोल व कालबद्ध विकास घडविण्याच्या प्रमुख उद्देशाने गोरेगाव विकास समितीची स्थापना झाली. अनेक समस्यांनी घेरलेल्या गोरेगावातील लोकजीवन सुसह्य व सुखी करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची प्रतिज्ञा करुनच ही समिती उभी राहिली.
विकास कार्याला सुरुवात करायची तर गोरेगावची परिपूर्ण व यथार्थ ओळख आपल्याला नको काय? आजच्या गतिमान जीवनात प्रत्येकाचा बहुतेक वेळ घराबाहेर, गावाबाहेर जातो. उपनगरातील माणसांचा बराचसा वेळ प्रवासातच जातो. त्यामुळे गावाची कशाला, शेजार-पाजारची माहितीही आपल्याला नसते. आयुष्यात केव्हां-कोणत्या गोष्टीची किंवा सेवेची गरज भासेल सांगता येत नाही. मग आयत्यावेळी धावपळ उडते.
एखादी पूजा किंवा अनुष्ठान करायचे ठरले तर पुरोहित कोठे मिळेल? समारंभासाठी व्ही. डी. ओ. शुटींगवाला कोठून बोलवायचा? - अशा अडचणींच्या प्रश्नांवर तात्काळ उत्तरे मिळण्याचे साधन हाताशी हवे. शाळा, महाविद्यालये माहित असतात पण विशेष प्रकारचे मार्गदर्शन देणारे अभ्यासवर्ग ठाऊक नसतात. गोरेगावकरांना ही सर्व आणि इतरही पुष्कळ माहिती या पुस्तकात पहायला मिळेल. ही सर्व माहिती अचूक असावी, परिपूर्ण असावी म्हणून आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न केले आहेत. सर्व नोंदी पुन्हा पुन्हा तपासून घेतल्या आहेत. आणि तरी सुद्धा या मार्गदर्शिकेत उणिवा - चुका राहिल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्याला अशा चूका - उणिवा आढळल्यास आमच्या निदर्शनास जरुर आणव्यात. पूढील आवृत्तीच्या वेळी या सूचनांचा निश्चितच उपयोग होईल.
शिवसैनिकांनी य पुस्तकासाठी बरीच उपयुक्त माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांना भागाभागातून फिरावे लागले. त्यामुळे मार्गदर्शिकेचा पाया भक्कम झाला. दुसर्या टप्प्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सर्वेक्षणाचे व संकलनाचे काम पूर्णत्वास नेले. कार्यकर्त्यांच्या व विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमामुळेच आम्ही या पुस्तकात १०,००० हून अधिक नोंदी देऊ शकलो आहोत.
मजकुराचे संकलन करताना वृत्तपत्रे, साप्ताहिके, निर्देशिका, दैनंदिन्या, सरकारी परिपत्रके, अहवाल, पुस्तके यांची फार मदत झाली. दैनंदिन जीवनात उपयोगी पडेल अशी सर्वसाधारण माहिती ’तर काय कराल?’ या पुस्तकावरुन घेतली आहे. त्याबद्दल श्री. सतीश नाईक, श्री. मोहाडीकर व ’अपना बाजार’ यांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच!
गोरेगावचा आजचा तोंडवळा आधुनिक दिसत असला तरी त्याला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. जुन्या गोरेगावची उद्बोधक तितकीच रंजक माहिती देण्याची महत्वाची जबाबदारी गोरेगावातील ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते श्री. मधुकर सामंत व पत्रकार श्री. श्रीकृष्ण शिदोरे यांनी स्वीकारली. सखोल संशोधन करुन, अस्सल दस्तऎवजांवरुन त्यांनी गोरेगावचा इतिहास सादर केला आहे. आजच्या आणि उद्याच्या पिढ्यांना ही अधिकृत माहिती सदैव मार्गदर्शक वाटत राहील.
श्री. यशवंत धुरी यांनी गोरेगावचे सोपे-सुटसुटीत नकाशे तयार करुन दिले. जमविलेली सारी माहिती संगणकातून योग्य पद्धतीने मांडून डॉ. पूर्णचंद्र सारंग (इन्स्टिट्युट ऑफ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग), श्री. जे. डी. मोदे स्पेक्ट्रम ऑफसेट प्रिन्टर्स प्रा. लि.) व श्री. दयानंद बन्सी (आल्पस् सेट) यांनी बहुमोल सहकार्य केले. त्यापुढील मुद्रणाचे काम एम्. के. प्रिन्टर्स यांनी सुबकतेने पूर्ण केले.
सर्वात महत्वाचे सहकार्य जाहिरातदारांचे तसेच वैयक्तिक किंवा संस्थेची माहिती पुरविणार्या असंख्य हितचिंतकांचे. त्यांच्या सहभागाखेरीज हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नसता.
गोरेगावाच्या इतिहासातील हा पहिलावाहिला प्रयत्न. आपण या मार्गदर्शिकेचे आपलेपणाने स्वागत कराल, असा विश्वास वाटतो.
आपला नम्र,
श्री. सुभाष देसाई
संपादक, ’आपले गोरेगाव’ मार्गदर्शिका
प्रथम आवृत्ती : २८ नोव्हेम्बर, १९९२. |