|
 |
श्री. सुभाष देसाई यांनी ज्ञान - कला - सेवा ह्या त्रिसूत्रींच्या पायावर प्रबोधन गोरेगाव संस्थेची स्थापना केली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहाय्य उपलब्ध करुन देणे हे संस्थेच्या मुलभूत उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट. शुभारंभाच्या वर्षापासूनच सुरु झालेला एक महत्वाचा लोकोपयोगी उपक्रम म्हणजेच एस्. एस्. सी. विद्यार्थी व्याख्यानमाला. शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करून दाखविण्याच्या आगामी योजनांची सुरुवात म्हणून दिनांक १० फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी १९७३ साली पाटकर महाविद्यालयात महत्वाच्या आठ विषयांवर मुंबईतील शिक्षकांची व्याख्याने झाली. या तज्ज्ञ व अनुभवी व्याख्यात्यांनी आपापल्या विषयावर माहितीपूर्ण विवेचन केले. अभ्यासक्रमातील खाचाखोचा, महत्वाचे प्रश्न, अभ्यासाची रुपरेषा व उत्तरपत्रिका लिहिण्याचे तंत्र या सर्व अंगांवर उपयुक्त सूचना केल्या. विद्यार्थ्यांमध्ये एक नवा आत्मविश्वास व उमेद निर्माण केली. प्रत्येक व्याख्यानास सरासरी ४०० विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून व्याख्यानमालेस घवघवीत यश प्राप्त करून दिले. पूढे मार्चमधे परीक्षा आटोपल्यावर तत्कालीन कार्यकारी मंडळाने केलेल्या पाहणीचे वेळी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी व्याख्यानमालेमुळे मोठा लाभ झाल्याचे सांगितले. तेंव्हाच हा उपक्रम अधिकधिक व्यापक करण्याचा निश्चय श्री. सुभाष देसाई यांनी केला.
तद्नंतर प्रत्येक वर्षी या उपक्रमास मिळणारा प्रतिसाद वाढतच गेला. अधिकाधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत गेला आणि कार्यकर्त्यांचा उत्साह देखील प्रती वर्षी द्विगुणित होत गेला.
सृजनशील बुद्धीला अनिर्बंध संचार करावयाला शिक्षण क्षेत्रात अनंत संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना घडविण्याचे सामर्थ्य तसेच गगनाला गवसणी घालण्याचा ध्येयवाद निर्माण करण्याची शक्ती फक्त शिक्षकातच असते. आजच्या संगणकीय युगात नेमक्या वेळात, नेमक्या पद्धतीने, नेमके लिहीले तरच विद्यार्थ्यांन शालान्त परीक्षेच्या गुणस्पर्धेत यशस्वी होण्यास मदत होईल. वर्षभराचा अभ्यास दोन ते तीन तासात शिकविणे हे काम शिक्षकच करू शकतात. याच उद्दिष्टाने सुरु झालेल्या श्री. सुभाष देसाई प्रबोधन गोरेगावतर्फे एस्. एस्. सी. व्याख्यानमालेचे आयोजन करतात.
ज्ञानार्जनासाठी विद्यार्थ्यांना मदत करणार्या या उपक्रमाचे विद्यार्थीच नव्हे तर पालकवर्गाकडून देखील तेवढेच स्वागत केले जाते. |
|