१६३ गोरेगाव विधानसभा मतदारसंघ

Subhash Desai

मी गोरेगाव बोलतोय

 

goregaon

मी गोरेगाव. माझ्या नावातील ‘गाव’पणाचा मला सार्थ अभिमान आहे. कधी काळी माझी गणना एका छोट्याशा गावातच होत होती आणि त्याचंमुळे माझी ओळख सांगितले जाते- गोरेगाव !

१८५३ साली मुंबई-ठाणे रेल्वे सुरु झाली तरी पश्‍चिम किनार मार्गाने आगगाडी धावायला लागली ती १८६५ साली. ग्रँटरोडपासुन निघणारी लोकल वसई रोड स्टेशनपर्यंत जायची. त्या मार्गावर चारच स्टेशने होती. अंधेरी, पहाडी, बोरिवली आणि भाईंदर. पहाडी नावानं ओळखलं जाणारं स्टेशन म्हणजेच आजचं गोरेगाव. १८६२ सालीच ‘पहाडी’ स्थानक बांधलं गेलं होतं. मुंबईपासुन बडोद्याला जाणारी गाडी बलसाड नजीकच्या ‘पारडी’ गावातुन जायची, पारडी आणि पहाडीमध्ये गफलत होऊ नये म्हणून ‘पहाडी’ ला नवीन नाव दिलं गेलं ’गोरेगाव’ आणि मला माझ्या नावाचं स्थानक मिळालं.

तसा साठेक वर्षापूर्वी माझा हा परिसर डोंगर टेकड्यांनी, झाडाझुडपांनी व्यापलेला होता. माझ्या जंगल भागाचं वातावरण गाईगुरांना पोषक ठरेल म्हणून स्वातंत्र्य मिळण्याआधीच १९४६ साली इथं ‘आरे दुग्ध वसाहत’ साकारली आणि ‘आरे कॉलनी चं गाव’ म्हणून माझी ओळख जगभर झाली. त्याच काळात मला ‘गाव’ म्हणून मान्यता मिळाली, गोरेगाव ग्रामपंचायतीची स्थापना झाली. सिव्हिल इंजिनीयर असलेले पंढरीनाथ म्हात्रे यांनी केलेल्या ग्रामपंचायतीच्या स्थापनेमुळे माझ्या गोरेगावकरांच्या विकासाचा विचार पुढे आला आणि विकास कामांना चालना मिळाली. गोरेगावांत फिल्मिस्तान स्टुडिओ उभा राहिला आणि चित्रपट क्षेत्रांतील मान्यवरांचे पाय माझ्याकडे वळू लागले. माझ्या फिल्मिस्तान स्टुडिओत निर्माण झालेल्या चित्रपटांनी इतिहास निर्माण केला याचा मी अभिमान बाळगून आहे. माझ्या दक्षिण दिशेला असलेलं राममंदिर आणि आरे रोडवरील अंबामातेचं मंदिर ही माझ्या गोरेगावकरांची श्रध्दास्थानं. वर्ष उलटली, दशकं मागे पडली, तरी गोरेगावकरांच्या मनातील अंबामाता आणि रामावरील श्रध्दा कायम आहेत.

१९५६ साल. माझ्या आयुष्यातील महत्वाचं साल. ओशिवरा नदीपर्यंत असलेलं मुंबई शहर खाडीच्या पलिकडे विस्तारीत करण्याचा निर्णय झाला. माझा समावेश मुंबई शहरात झाला. आणि माझं गावपण संपलं. विकास प्रक्रियेला वेग आला. सिध्दार्थनगर आकारलं होतंच त्यामागून उन्नत नगर, मोतीलाल नगर, टिळक नगर आकार घेऊ लागली. घरं उभी राहात गेली आणि माणसाची वस्ती वाढु लागली.१९६० साली महाराष्ट्र राज्य स्थापन झालं. मराठी भाषिकांच्या महाराष्ट्रात मराठी माणूसच डावलला जाऊ लागला. त्यामुळेच १९६६ साली शिवसेना स्थापन झाली. मुंबईत घडणार्‍या घटनांचे पडसाद माझ्या भागात उमटले नसते तरच नवल! वर्षभरात माझ्या भागात शिवसेनेची शाखा सुरु झाली. माझ्या वसाहती घरांतून वास्तव्य करणारे मराठी तरुण एकत्र येऊन मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी उभे ठाकले आणि मराठी मंडळीच्या सांस्कृतिक विकासासाठी झटू लागले. त्या ध्येयवादी तरुणांनीच १९७२ साली गुढीपाडव्याचा मुहुर्त साधून माननीय शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कला, क्रीडा आणि ज्ञानाच्या संवर्धनासाठी ‘प्रबोधन गोरेगाव’ची स्थापना केली. ‘प्रबोधन गोरेगाव’ च्या स्थापनेमागे कार्यकर्त्यांचा निश्‍चित दृष्टीकोन होता. म्हणूनच कार्यक्रमाच्या आखणीत निश्‍चित दिशा होती. माननीय श्री. सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनातून प्रबोधन गोरेगावने एकएक कार्यक्रम आणि विविध उपक्रम हाती घेऊन यशस्वी करुन माझ्या परिसरातील जनतेमध्ये वेगळी प्रतिमा निर्माण केली. सामजिक, सांस्कृतिक, क्रीडा, वैद्यकीय, शैक्षणिक या सर्व क्षेत्रांना प्रबोधनच्या कार्यकर्त्यांनी स्पर्श केला. प्रबोधन गोरेगावने वक्‍तृत्व स्पर्धा घेतल्या, व्याख्यानमाला आयोजित केल्या, एस. एस. सी. व्याख्यानमाला ठेवल्या, नाट्यमहोत्सव भरवले, एकांकिका स्पर्धा घेतल्या, रंगावली प्रदर्शने व संगीताचे कार्यक्रम आयोजित केले. क्रीडाभवनाच्या माध्यमातून देशी- विदेशी क्रीडांना प्रोत्साहन दिले. हर्बल प्रदर्शनातून आयुर्वेदाची महती लोकांना पटवून दिली.

आमदार सुभाष देसाईंच्या कल्पनांच्या भरारीतून एकेका कार्यक्रमाचं आयोजन होत असते. ’मुंबई फेस्टीवल’ ही त्यांचीचं संकल्पना. या फेस्टीवलमुळे अनेक संगीतकला क्षेत्रातील मान्यवरांच्या कलेचा आनंद माझ्या नागरिकांना मिळाला. स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या तेजस्वी देशभक्‍तांवर जाहीर चिखलफेक झाली आणि त्याच्या देशभक्‍तीसंबंधी संशय दाखविला गेला तेंव्हा देसाईंनी माझ्या भूमीत ’स्वातंत्र्यवीर सावरकर उत्सवाचं’ आयोजन केलं. आधुनिक जीवनपध्दतीतील जॉगिंगचं महत्व ओळखून सुभाष देसाईंनी ’प्रबोधन जॉगर्स पार्क’ सुरु केलं. ’ओझोन जलतरण तलाव’ सुरु करुन प्रबोधन गोरेगावने माझ्या नागरिकांना पोहण्याची सोय उपलब्ध करुन दिली.

तरुणांना दिशा देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी करियर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्याची कल्पनाही सुभाष देसाईंचीच. समाजोपयोगी कार्यांची नेमकी जाणीव देसाईंना आहे. त्यामुळे विभागातील नागरिकांना, सामान्यातील सामान्य माणसाला उपयुक्‍त ठरेल असं प्रत्येक काम देसाई उत्साहानं हाती घेतात आणि यशस्वीरित्या तडीसही नेतात. स्व. माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे रक्‍तपेढी सुरु करुन त्यांनी लोकांना माफक दरात रक्‍त मिळण्याची व्यवस्था केली. वैद्यकीय आरोग्य शिबिरात त्यांनी जनसामान्यांना वैद्यकीय तपासणीची संधी मिळवून दिली. ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र मिळवून देण्यासारख्या योजनांद्वारे त्यांनी माझ्या ज्येष्ठ नागरिकांना सेवा पुरविल्या तर बॉम्बस्फोटातील मृत व्यक्‍तींच्या कुटुंबीयांच्या भेटी घेऊन त्यांना दिलासा दिला. महाजलप्रलयाच्या वेळीही जगण्यावरचा विश्‍वास उडवून बसलेल्या नागरिकांना उभारी देण्यासाठी सुभाष देसाईंनी अनेक प्रकारे मदत केली.

बकालपणा हा कोणत्याही नगरीला कलंकच असतो. माझं सौंदर्य जवळून पाहिलेल्या, अनुभवलेल्या सुभाष देसाईंनी माझ्या नागरिकांना सुसह्य जीवन जगता यावं, माझं रुप-स्वरुप सौंदर्यपूर्ण भासावं म्हणून अनेक गोष्टी केल्या आहेत. त्यांनी डंपिग स्टेशनचा प्रश्न मार्गी लावला. मला मच्छरमुक्‍त करण्यासाठी यथायोग्य उपाययोजना केली. अनेक दुर्लक्षित उद्यानांचं नूतनीकरण केले. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आंदोलन उभारलं. नागरिकांना आवश्‍यक ते पाणी मिळावं म्हणूनही त्यांनी काम केले. सच्चा कार्यकर्ता कार्य करीत असतो आणि समाज त्याच्या कार्याचं मूल्यमापन करीत असतो. त्यातूनच कार्यकर्त्याच्या कार्याचं मोठेपण जाणलेल्या संस्था पुरस्कार देऊन कार्यकर्त्याचा सन्मान करीत असतात. धर्मवीर आणि महाराष्ट्र रत्‍न पुरस्काराने सुभाष देसाईच्या कार्याचा गौरव झाला आहे.

एका ’दुर्लक्षित गावापासून’ एका ’सुनियोजित, स्वच्छ, सुंदर उपनगरापर्यंतचा’ माझा प्रवास म्हणजे विकासाचा चढता आलेख आहे. एक एक टप्पा पार करीत माझी ही वाटचाल झाली आहे. ‘माझी ही वाटचाल झाली आहे’ असं जरी मी म्हणत असलो तरी मला आपलं म्हणणार्‍या आणि मानणार्‍या सुभाष देसाईंसारख्या समाजसेवकांच्या अविरत कार्यातूनच मला हे रुप मिळालं आहे याची मला पूर्ण जाणीव आहे.

माझ्याकडे काय नाही? पाटकरसारखे नामांकित महाविद्यालय आहेचं त्याखेरीजही दुसरी चार महाविद्यालये उच्च शिक्षणासाठी कार्यरत आहेत. जलतरण तलाव, मैदाने, उद्याने आहेत. अत्याधुनिक रक्‍तपेढी आहे. सकाळी फिरावयास जॉगिंग ट्रँक व रमणीय रस्ते आहेत. चकचकीत मॉल्स आणि खुप पडदे असलेली मल्टीप्लेक्‍स थिएटर्स आहेत. मनोरंजनासाठी शरीरसौष्ठवासाठी क्‍लब आणि व्यायामशाळा आहेत. झोपडपट्ट्यांसाठी भरपूर शौचालये तर सुभाष देसाईंनी बांधून दिली आहेतचं त्यामुळे आता उघड्यावरील प्रात:विधी ही गोष्ट भूतकाळात जमा झाली आहे. एमएमआरडीएच्या रस्ते रुंदीकरणात हटवलेल्या झोपडीधारकांना गोरेगावातच घरकुले मिळवून देण्याचे श्रेय देखील श्री. देसाई यांनाचं जाते.

वॉर्ड ऑफिसची मध्यवर्ती ठिकाणी स्वतंत्र इमारत, आणखी चार उड्डाणपूल, दोन पादचारी भूयारी मार्ग, ओशिवरा रेल्वे स्टेशन, सिध्दार्थ हॉस्पिटलचे सुसज्जीकरण हे सर्व होतं आहे. त्यामुळे माझे रंगरुप अधिक बहारदार होईल यात काय संशय? हे सर्व खरेच. पण ‘मुंबईची शान’ हा गौरव मला मिळायचा असेल तर पुढे खूप काही करावे लागणार आहे. त्यासाठी माझ्या सर्व गोरेगावकरांनी पुढे आले पाहिजे. कचरा हटाव मोहिमेत भाग घेतला पाहिजे. पाणी जपून वापरावे. पाणी टंचाई जाणवणार आहे. महापूराचे संकट पुन्हा भेडसावू नये म्हणून गटारे- नाले रुंद करावे लागणार आहेत. यासाठी सर्वांचे सहकार्य नको काय? सौंदर्यीकरणात प्रत्येकाने थोडा थोडा वाटा उचलावा.

चला, माझ्या लेकरांनो, गोरेगावकरांनो, आमदार सुभाष देसाई यांच्या ‘माझे गोरेगाव मुंबईची शान’ हे स्वप्न साकार करण्यासाठी हातात हात गुंफून पुढे जाण्यासाठी तयार व्हा !
सत्तेत असो वा नसो, पद लाभो वा न लाभो, सतत समाजोपयोगी कामं करण्याची मानसिकता असणारे आमदार श्री. सुभाष देसाई यांच्यासारख्या समाजसेवकामुळेच अधिकाधिक स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं होणं मला शक्‍य होणार आहे. हे मला अगदी मनापासून नमूद करावसं वाटतं. त्यामुळेच भविष्याबद्दल मी निश्‍चिंत आहे !

One Response to “मी गोरेगाव बोलतोय”

Leave a Reply