१६३ गोरेगाव विधानसभा मतदारसंघ

Subhash Desai

चला, विचारांचे सोने लुटू या…

IMG-20151022-WA0000
सस्नेह  जय महाराष्ट्र,
छत्रपती शिवरायांच्या कृपाशिर्वादाने, मॉसाहेब  मीनाताई ठाकरे, हिंदुहृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या शुभाशिर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजीनी दाखविलेल्या विश्वासाने आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ह्यांनी सोपविलेल्या जबाबदारीमुळे महाराष्ट्राचा उद्योगमंत्री म्हणून ह्या ब्लॉगच्या माध्यमातून मी आपल्याशी संवाद साधतो आहे. खूप बर वाटतंय हा संवाद साधताना. व्यग्र दिनक्रमामुळे मोकळा वेळ मिळणे कठीण होते. परिणामी प्रत्यक्ष  संवाद साधायला विसाव्याचे चार क्षण मिळत नाही. पण आधुनिक तंत्रज्ञानाने एकाचवेळी लाखो सुहृदांशी संवाद साधण्याची सोय करून दिली आहे.

हे तंत्रज्ञान म्हणजे शारदेचे जणूकाही नवंरुपच आहे. आज तर शारदोत्सवच्या उद्यापनाचा मंगल दिवस,  “विजयादशमी ”. सर्वप्रथम या विजयादशमीच्या तुम्हा  सर्वाना महन्मंगल शुभकामना. माता सरस्वतीने आपणा सर्वावर ज्ञानरूपी छायाछत्र  धरावे, अशी तिला प्रार्थना. तिच्या कृपाप्रसादाशिवाय आपल्याला ज्ञान लाभत नाही. ज्ञान लाभले नाही तर आपल्या उद्योग- व्यवसायात, कार्यक्षेत्रात आपण प्रगती करू शकत नाही. प्रगतीच झाली नाही तर लक्ष्मीसुध्दा प्रसन्न होत नाही. म्हणून श्री शारदेला मनोभावे वंदन.

मित्रहो,  आपल्या अगणित शुभेच्छामुळे महाराष्ट्राचा उद्योगमंत्री म्हणून काम पाहत असताना मी नव्याने काही शिकतो आहे. इतकी वर्ष राजकारण आणि समाजकारण यात कार्यरत राहिलेलो असल्याने अनुभवाची जी काही शिदोरी जमलेली आहे, तिचा या विभागात उपयोग करून देताना, नवी धोरणे आणि संकल्पना राबविताना खूप समाधान लाभतंय. त्यासोबतच अवतीभवतीच्या लहानथोर माणसांकडून सुद्धा खूप काही शिकायला मिळतंय. जे – जे चांगले ते – ते मधुकरवृत्तीने वेचीत जाण्याचा माझा स्थायीभाव असल्याकारणाने नवनवीन जे चांगले आहे. ते विद्यार्थी होऊन शिकायला मला मनापासून आवडते. आता हेच पाहा ना , इंटरनेटशी आपण इतकी सलगी करून ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हा सर्वांशी सुसंवाद साधू असं वाटलं नव्हतं. पण  इंटरनेट हे नव्या युगाचं ज्ञानदालन आहे. ते अस्पर्शित ठेवलं असतं तर मी खूप चांगल्या गोष्टीपासून अनभिज्ञ राहिलो असतो, पण नेटाने मी नेटशी जुळवून घेतले आणि आज  ब्लॉगवरून तुमच्याशी गप्पा मारतोय, इंटरनेट काय किंवा भोवतालची माणसे काय, कधी काय शिकवतील आणि आपण ज्ञानसंपन्न, अनुभवसंपन्न होऊ, ते काही सांगता येत नाही. समोरच्याचा हुद्दा काय, तो गरीब कि श्रीमंत ह्याचा विचार मनाला स्पर्शू देवू नका. तर तो काय चांगलं शिकवतोय ते मनाला खोलवर स्पर्शू द्या, ही आदरणीय बाळासाहेब यांची शिकवण, ह्या शिकवणुकीमुळे खूप काही मिळविता आलं.

या जीवनप्रवासात जे काही  शिकता आलं, मिळविता आलं ते सुद्धा ह्या ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्याशी बोलणार आहे. माझ्या विभागातील योजना, विभागाची वाटचाल या विषयी सुद्धा आपल्याशी बोलणार आहे. तुमचे विचार, सूचना, तुमच्या मनातील संकल्पना सुद्धा जाणून घ्यायला मला आवडेल. मी वर म्हटलेलंच आहे. की ,माझी वृत्ती ही मधुकर वृत्ती आहे. स्वत:च्या ज्ञानात अव्याहत भर पडत राहावी, यासाठी मी सतत प्रयत्नशील असतो.

दसऱ्याच्या दिवशी सरस्वतीपूजन करण्याचे संस्कार आपल्या मनावर बालवयापासून बिंबविले असतात. आपण शाळकरी असतानापासून पाटीवर आकड्यांची सरस्वती रेखाटायची आणि तिची पूजा करायची, ही आपली संस्कृती, ह्यालाच जोडून आणखी एक परंपरा आपण जपली – जोपासली आहे ती म्हणजे आयुधांची- हत्यारांची पूजा. आयुधे म्हणजे केवळ शस्त्रे  एवढाच अर्थ मर्यादित नाही. आपल्या उद्योग – व्यवसायतील साधनांची, यंत्रसामुग्रीची सुद्धा मनोभावे पूजा करतो. आपली हिंदू संस्कृती अतिशय उदात्त आणि अर्थपूर्ण आहे. आपल्याला जगवण्यासाठी सहाय्य करणाऱ्या प्रत्येक निसर्ग घटकाबद्दल कृतज्ञ राहण्याचे संस्कार आपल्यावर होत असतात. आजच्या दिवशी आपण आपल्या जीवन साधनांची, यंत्रसामुग्रीची पूजा  करतो. आपल्याला उतरोत्तर यश लाभावे, म्हणून कामना करतो, प्रार्थना करतो. “उद्योगाचे घरी; देवता लक्ष्मी वास करी ” हे आपले संस्कार. उद्योगात मग्न झाल्याशिवाय, उद्योग व्यवसाय वाढविल्याशिवाय सुखसमृद्धी, संपन्नता येत नाही, हे आपल्याला माहित आहेच. महाराष्ट्र उद्योगात सदैव अग्रेसर होईल. मला हे घडताना पहायचंय त्यासाठीच मी अहोरात्र प्रयत्न करतो आहे. महाराष्ट्रात उद्योग वाढले पाहिजेत, जुन्या उद्योग-व्यवसायाना उर्जितावस्था आली पाहिजे आणि महाराष्ट्राची अखंड भरभराट झाली पहिजे, ही माझी प्रामाणिक भावना आहे. मा. मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आपण महाराष्ट्रात थेट परकीय गुंतवणूक आणण्यात कमालीचे यशस्वी होत आहोत. उद्योगाचे रूप पालटत चालले आहे. या सर्वांचे फलित काय आहे, त्याविषयी मी विस्ताराने आपल्याशी बोलणार आहेच. उद्योग क्षेत्रातील सकारात्मक वातावरणामुळे आपल्या राज्याचा “पंच पुरस्कार ” देऊन कसा गौरव झाला, त्याची पार्श्वभूमीपण मी आपल्याला सांगणार आहे. आणखी एक गोष्ट आपल्याला आज सांगायची आहे, ती  सांगितल्यावर तुम्ही म्हणाल की सांगायची गरज काय ? हे तर आमच्या रक्तात आहे. श्वासात आहे, तरी पण सांगणार आहे. कारण ते अनुभवतांना जसा ऊर भरून येतो. तसाच सांगतानाही येतो. आज पंरपरेप्रमाणे शिवतीर्थावर होणारा आपल्या शिवसेनेचा दसरा मेळावा. आपल्या जीवाभावाच हिंदवी संमेलन. आपल्याला निमंत्रणाची आवश्यकता नाही मित्र हो , शिवसेना हा आपल्या जगण्याचा गाभा आहे. आपण येणार नि:संशय !  तेव्हा या संध्याकाळी शिवतीर्थावर भेटू या… विचारांचे सोने लुटू या आणि ते विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी पुन्हा वचनबद्ध होऊ या !

पुढल्या आठवड्यात पुन्हा बोलूच, तोपर्यंत अर्धविराम.

जय शिवराय ! जय हिंद !! जय महाराष्ट्र !!!

Leave a Reply