१६३ गोरेगाव विधानसभा मतदारसंघ

Subhash Desai

चला, उद्योगसंपन्न होऊ या…

औद्योगिक प्रगतीशिवाय कोणतेही राज्य, राष्ट्र किंवा कोणताही समाज वेगाने विकास साधू शकत नाही. विविध प्रकारचे उद्योग, त्या उद्योगांमधून निर्माण होणारा रोजगार, त्या उद्योगांमुळे निर्माण होणार्‍या पायाभूत सुविधा आणि स्वयंरोजगाराची स्थिती सामाजिक जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घडविण्यास कारणीभूत होते. हिंदुस्थानचा विचार करता औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्र हे प्रारंभापासूनच अव्वल राज्य राहिले आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेलं मुंबई शहर तर आंतरराष्ट्रीय शहर म्हणून लौकिकास पात्र ठरलेलं, मुंबई बंदरसुद्धा जागतिक दर्जाचं व्यापारी बंदर म्हणून लोकप्रियता मिळवलेलं. मधल्या काळात मात्र गुंतागुंतीच्या, कालबाह्य आणि काही चुकीच्या धोरणांमुळे औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राची पीछेहाट झाल्याची स्थिती निर्माण झाली होती. आता पुन्हा ही परिस्थिती बदलू लागल्याची सुचिन्हे दिसू लागली आहेत. पुन्हा एकदा उद्योजक आणि गुंतवणूकदारांच्या दृष्टीने पहिल्या पसंतीचं राज्य म्हणून महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. गेल्या वर्षभराच्या. महिन्यांच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रात काही हजार कोटींची गुंतवणूक आलेली आहे. त्यातून नवनवे उद्योगधंदे उभे राहत आहेत आणि त्यामधून कुशल-अकुशल रोजगारांची निर्मिती होत आहे. केंद्रात आणि राज्यामध्ये सत्ताबदल झाल्यानंतर विविध विभागांच्या धोरणांमध्ये अमुलाग्र बदल करण्यात आले. हिंदुस्थानचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी साहेबांनी ‘मेक इन इंडिया – मेड इन इंडिया’ ही घोषणा दिली. महाराष्ट्राचे तरुण, कर्तबगार मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजींनीही नवनव्या संकल्पना मांडल्या. उद्योगमंत्री म्हणून माझ्या विचारांचा आणि दृष्टिकोनाचा आदर ठेवत नवे धोरण तयार करण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याची पूर्ण मोकळीक दिली. त्यामुळे आपल्या राज्यातील औद्योगिक क्षेत्रामध्ये जे निरुत्साही वातावरण निर्माण झालं होतं, ते बदलण्यास सुरुवात झाली. आता १३ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात ‘मेक इन इंडिया वीक’ सुरु होतो आहे आणि तोसुद्धा राजधानी मुंबईमध्ये. अशाप्रकारची सकारात्मक परिस्थिती निर्माण होण्यामध्ये राज्याच्या उद्योग मंत्रालयाचा आणि सर्वांनी घेतलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा फार मोठा वाटा आहे, असं मला वाटतं.उद्योगमंत्रालयाचा मंत्री ह्या नावाने जेव्हा जबाबदारी घेतली, तेव्हा मनात हाच निश्‍चय केलेला होता की, महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रातील सोन्याचे दिवस परत आणण्याचा नेटाने प्रयत्न करायचा. ह्या क्षेत्रात सुगीचे दिवस सुरु झाले तर, वेगवेगळ्या समस्यांचे उपास सापडण्याससुद्धा मदत होईल; ही यामागची धारणा होती. त्या दिशेने दमदार पावलं पडत आहेत; हे उत्साहवर्धकच आहे.मुळात नवे उद्योगधंदे आपल्या राज्यात घेऊन येत असताना; एका गोष्टीचं भान ठेवावं लागतं ते हे की, जुन्या उद्योगव्यवसायांकडे कोणत्याही परिस्थितीमध्ये दुर्लक्ष होणार नाही याचं. म्हणूनच, प्रारंभापासून माझा दृष्टिकोन हाच आहे की, जे जुने उद्योगधंदे तोट्यात आहेत; काही बंद आहेत; त्यांना पुन्हा कार्यान्वीत करणे. त्यासाठी उद्योग विभागाच्या कार्यकक्षेत येणार्‍या ज्या काही उपाययोजना आहेत, त्या त्वरित करणे. मी ह्याला प्राधान्य दिलेले आहे. पायाभूत सुविधा, सवलती देतांना विशिष्ट विभागाला झुकते माप तर विशिष्ट विभागाला सहकार्य करताना हात आखडता घ्यायचा; हे माझ्या विचार आणि कार्यशैलीमध्ये न बसणारं असल्यामुळे नियमाप्रमाणे समन्यायी धोरण हीच माझी भूमिका होती; आहे आणि शेवटपर्यंत राहणार!उद्योगव्यवसाय सुरु करण्यासाठी एम.आय.डी.सी. कडून भूखंड मिळूनही ज्यांनी वर्षानुवर्षे उद्योग सुरु न करता सरकारी भूखंड अडवून ठेवण्याचं काम केलं, त्यांच्याकडून असे भूखंड परत घेऊन ते इतर होतकरू उद्योजकांना देण्याबाबत धडक कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. वीज, पाणी, रस्ते अशाप्रकारच्या अत्यावश्यक प्राथमिक सुविधा सर्वत्र उद्योजकांना समान सवलतीच्या दरात मिळायला हव्यात, हीसुद्धा माझी ठाम भूमिका आहे.उद्योगव्यवसायासाठी लागणार्‍या साधनसामुग्रीबाबत महाराष्ट्र संपन्न आहे. महाराष्ट्राला आर्थिक बळकटी देणार्‍या उद्योगव्यवसायाला बळकटी देण्यासाठी गरज होती ती गतिमान आणि पारदर्शी, सुलभ औद्योगिक धोरणाची! उद्योगमंत्री ह्या नात्याने ते तयार करण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्यात मला यश मिळते आहे; ह्याचा मला नक्कीच अभिमान आहे. औद्योगिक क्षेत्रात अमुलाग्र बदल झाल्यामुळे, सकारात्मक वातावरण निर्माण झाल्यामुळेच देशातील पहिला वहिला ‘मेक इन इंडिया वीक’ महाराष्ट्राच्या राजधानीत घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मला वाटतं, माझ्या उद्योग विभागासाठी हे गौरवास्पदच आहे! उद्योग मंत्रालयाची गुणवत्ता आणि अथक परिश्रम घेण्याची वृत्ती सिद्ध करण्यासाठी वेगळ्या प्रमाणपत्राची गरज आहे; असे मला वाटत नाही. मला वाटतं की, सुरुवात तर फार चांगलीच झालेली आहे. पुढला प्रवाससुद्धा लखलखत्या यशाचाच असेल. प्रेरणास्त्रोत आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचे शुभाशिर्वाद अखंड सोबत आहेत; मा. शिवसेनापक्षप्रमुख उद्धवजींचा अतूट विश्‍वास आहे आणि आपणा सर्वांचं प्रेम पाठबळसुद्धा असल्याने महाराष्ट्राला उद्योगक्षेत्रामध्ये विश्‍ववेधी करण्यात आम्ही नक्कीच यशस्वी होऊ, असा मला विश्‍वास आहे. मुंबईच्या गिरगांव चौपाटीवर आणि बांद्रा कुर्ला संकुल १३ फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या ‘मेक इन इंडिया वीक’मध्ये मोठ्या संख्येने या; उद्योजक म्हणून या – उद्योगविस्ताराची महत्वाकांक्षा घेऊन जा. प्रेक्षक म्हणून या – उद्योजक बनण्याची प्रेरणा घेऊन जा.या; एकत्रित पुढे जाऊ या. आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या स्वप्नातील वैभवसंपन्न, उद्योगसंपन्न महाराष्ट्र घडविण्यासाठी कार्यरत होऊ या!
जयहिंद!
जय महाराष्ट्र!!

Leave a Reply