१६३ गोरेगाव विधानसभा मतदारसंघ

Subhash Desai

सर्वे संतु निरामय :

सस्नेह जय महाराष्ट्र !
महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यानंतर, विशेषत: शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यानंतर सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा उंचावल्या. आता सकारात्मक बदल होतील, अशी सार्थ भावना जनतेच्या मनामध्ये निर्माण झाली. त्या दृष्टीने आपले सर्वच मंत्री काम करत आहेत. गरिबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वांच्याच दृष्टीने महत्वाचा विषय असलेला आरोग्य विभाग.
या विभागात आपले शिवसैनिक डॉ. दीपक सावंत मंत्री म्हणून लाभलेले आहेत. ते स्वत: डॉक्टर असल्यामुळे त्यांच्या वैद्यकीय ज्ञानाचा प्रभाव या विभागावर पडणार आणि जनतेच्या दृष्टीने लाभदायक निर्णय घेतले जाणार, हे ओघाने आलेच. त्याची दमदार सुरुवात आपल्या आरोग्यमंत्र्यांनी केलेली आहे. गोरगरिबांच्या हितासाठी त्यांनी ‘ राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने ‘ मध्ये आमुलाग्र बदल घडवून आणत ‘बाळासाहेब ठाकरे जीवनदायी आरोग्य योजने’ च्या रुपात ती महाराष्ट्रभर लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर्वसामान्य जनतेचे आरोग्य उत्तम राहिले पाहिजे, त्यांना अल्प दरात किंवा आवश्यक तेथे मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्या पाहिजेत, ही आदरणीय हिंदुहृदय सम्राटांची तळमळ होती. शासनाने या कामी पुढाकार घेतला पाहिजे, असा त्यांचा आग्रहच होता. त्यामुळेच १९९५ ते १९९९ या काळात तत्कालीन युती सरकारने ‘ जीवनदायी आरोग्य योजना ‘ महाराष्ट्रात राबविली होती. नंतरच्या काळात कॉंग्रेस आघाडी सरकारने या योजनेची नक्कल करताना तामिळनाडू, आंध्र प्रदेशच्या योजनांमधला काही काही भाग उचलला आणि युती सरकारच्या मूळ योजनेला ‘ राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ‘ असे नाव दिले. नेहरू-गांधी घराण्याचे नाव पुढे रेटायचे हे त्यांच्या प्रवृतीला अनुसरूनच त्यांनी केले म्हणा !
उदाहरण द्यायचे झालेच तर एकट्या मुंबईत आणि आसपासच्या परिसरावर नजर फिरवून पहा, अनेक प्रकल्पांना गांधी-नेहरू घराण्यांची नावे दिल्याचे पाहायला मिळेल. न्हावा-शेवा बंदर (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) , राष्ट्रीय उद्यान (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान), वांद्रे-वरळी सागरी सेतू (राजीव गांधी सी लिंक), व्हिक्टोरिया गोदी (इंदिरा डॉक), विज्ञान केंद्र (नेहरू सेंटर)…. इतकेच कशाला शिवसेनेचा रेटा नसता तर आंतरराष्ट्रीय विमानतळाला सुद्धा शिव छत्रपतींचे नव्हे तर ‘ नेहरू विमानतळ ‘ असे नाव देण्याचा घाट कॉंग्रेसने घेतलेला होता. नेहरूंचा पुतळा बसविण्यासाठी चबुतरा सुद्धा बांधून तयार होता, अशा पद्धतीने सर्वत्र ‘ नेहरू-गांधी ‘ करणाऱ्या मंडळींना आरोग्यदायी योजनेचे नामकरण होणार म्हटल्यावर असह्य पोटशूळ उठला नसता तरच नवल ! हे अपेक्षित होते. पण सरकार बदलल्यावर काही ध्येयधोरणे बदलत जाणे स्वाभाविक असतेच. त्याप्रमाणे या सुधारित योजनेला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंसारख्या जनप्रिय नेतृत्वाचे नाव देण्याबाबत उगाच आरडाओरड करण्यात काही अर्थ नाही, असे मला स्पष्टपणे वाटते.
मुळात आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी या योजनेचा पूर्ण कायापालट केला आहे. नव्या योजनेत गुडघे बदलणे, फिजियोथेरपि, मुलांसाठी कॉक्लीयर ट्रान्सप्लांट ज्यामुळे बहिरेपण जाईल, राष्ट्रीय बालस्वास्थ सुरक्षा योजनेचा अंतर्भाव, किडनी ट्रान्सप्लांटसाठी रु. ३ लाखांपर्यंत सहाय्य, त्यात किडनी देणगीदाराला रु. १ लाख सहाय्य. पूर्वी हृदयावरील एन्जीयोप्लास्टीसाठी फक्त १ स्टेन्टचे पैसे मिळत, बाकीची व्यवस्था रुग्णाला करावी लागे. आरोग्यमंत्र्यांनी ३ स्टेटची मदत करण्याचे ठरविले आहे. आधीच्या योजनेमधील निरुपयोगी १२० उपचार आता हद्दपार केले जाणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे राज्यातील आणखी ७०० रुग्णालये ‘ बाळासाहेब ठाकरे जीवनदायी आरोग्य योजने ‘ मध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत. त्यामुळे या योजनेचा आवाका आता एक हजार कोटींच्यावर जाईल. केवळ खर्चच वाढेल असे नाही, तर अधिकाधिक रुग्णांना या योजनेचा लाभ घेता येईल. सर्वसामान्य नागरिकाला विनासायास औषधोपचार उपलब्ध होण्याचे बाळासाहेबांनी पाहिलेले स्वप्न खऱ्या अर्थाने आता पूर्णत्वाच्या दिशेने मार्गक्रमण होत आहे, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.
‘ प्रबोधन गोरेगाव ‘ या विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून मी स्वत: आणि आमचे सहकारी रुग्णसेवेमध्ये कार्यरत आहोत. सध्या अनेक परिसरात वैद्यकीय शिबिरे सुरु आहेत. सवलतीच्या दरात नामांकीत कंपन्याची औषधे व स्वस्तातील जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या ४ प्रबोधन औषध पेढ्या मुंबई परिसरात कार्यरत आहेत. रुग्णसेवेचे हे कार्य करत असताना सातत्याने वाटत राहायचे की, गोरगरिबांना मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणारी सरकारी व्यापक योजना असायला हवी. आज युती सरकारच्या माध्यमातून शिवसेनेचे डॉ. दीपक सावंत हे आरोग्यमंत्री या नात्याने बाळासाहेबांच्या नावाची ही योजना कार्यान्वित करत आहेत, ही उत्साहवर्धक घटना आहे.
महाराष्ट्रातील सत्ता बदलाचे स्वागत जनतेने केलेले आहे. त्याचप्रमाणे या सुधारित योजनेला आदरणीय बाळासाहेबांचे नाव देण्याच्या निर्णयाचे सुद्धा महाराष्ट्रभर स्वागत होत आहे. वैचारिक दिवाळखोरीने गांजलेल्या मंडळीना जी पोटदुखी सुरु झाली आहे, त्यावर इलाज महाराष्ट्रातील शिवप्रेमी आणि बाळासाहेबप्रेमी जनताच करील, हे नि:संशय !
आपण सर्वजण या योजनेचा लाभ गरजवंतांपर्यंत पोहोचविण्यासाठी आजपासूनच सिद्ध होऊ या. चांगल्या कामात उशीर कशाला ?
दीपावलीपूर्वी भेटूच पुन्हा. नव्या विषयावर बोलू, तोपर्यंत अर्धविराम .

Leave a Reply